महिला - पुरुषांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा उन्नती केंद्र व शेतउन्नती महिला FPCची वार्षिक सभा
धुळे : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत उन्नती लोकसंचालित साधन केंद्र, धुळे तसेच शेतउन्नती महिला फार्म प्रोड्यूसिंग कंपनी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा धुळे येथील कामगार भवन येथे उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांसह महिला सक्षमीकरणाला सहकार्य करणाऱ्या पुरुष सुधारकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन भिरडाईचे सरपंच राजेंद्र आहेरराव यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालयाचे स्मार्ट प्रकल्प अधिकारी रवींद्र सुरवसे, जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, जिल्हा महिला सक्षमीकरण अधिकारी तृप्ती पाटील, सखी वन स्टॉप सेंटरच्या विधी अधिकारी ॲड. गायत्री भामरे, प्रायमो कंपनीचे आरएमओ चंद्रकांत कोळी, सनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील, आयसीआयसीआयचे सेल्स मॅनेजर संदीप बच्छाव, उन्नती सीएमआरपी वर्षा पाटील, FPC अध्यक्षा उज्वला पाटील, सीएमआरसी सचिव भारती गुरव, FPC सचिव सुनिता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा जाधव यांनी केले. उन्नती लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका दिपाली भदाणे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी शेतउन्नती महिला फार्म प्रोड्यूसिंग कंपनीच्या वार्षिक कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.
२५ गावांतील पुरुष सुधारकांचा गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘पुरुष सुधारक सन्मान’ उपक्रमांतर्गत २५ गावांमधील निवडक पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या कार्याला सहकार्य करणाऱ्या या पुरुषांना टी-शर्ट, टोपी, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यासोबतच वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केलेले आर्थिक व सामाजिक कार्य, स्वावलंबनाच्या दिशेने केलेली वाटचाल आणि विविध उपक्रमांतील सहभागाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी केवळ महिलांचा सहभाग नव्हे, तर कुटुंबातील पुरुषांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. महिला-पुरुषांच्या एकत्रित सहभागातूनच कुटुंब, समाज आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधता येतो, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक दिपाली भदाणे, उपजीविका सल्लागार प्रशांत मोरे, सहयोगिनी संगीता ठाकरे, छाया पाटील, आशा जाधव, आशा गुरव आणि कविता माळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे यांनी केले. उपस्थित मान्यवर, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सभासद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा