धुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ कार्यान्वित


धुळे | 14 ऑगस्ट 2026 : महिलांवरील अत्याचार, छेडछाड तसेच कौटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून धुळे शहर, शिरपूर शहर आणि साक्री पोलीस ठाणे येथे ‘दामिनी पथकां’ची स्थापना करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या संकल्पनेतून ही विशेष पथके कार्यान्वित करण्यात येत असून, महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. या पथकांमध्ये महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश राहणार असल्याने पीडित महिला आणि मुलींना आपल्या तक्रारी व अडचणी अधिक सहजपणे मांडता येणार आहेत.

संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त

दामिनी पथकांकडून शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, उद्याने तसेच निर्जन रस्त्यांवर नियमित गस्त घालण्यात येणार आहे. छेडछाड करणारे, टवाळखोर आणि असामाजिक घटकांवर पोलिसांचा धाक निर्माण करण्यासोबतच अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

जनजागृती आणि समुपदेशनावरही भर

दामिनी पथकांकडून विद्यार्थिनी व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गुड टच-बॅड टच, महिला सुरक्षेसाठी उपलब्ध हेल्पलाईन क्रमांक डायल 112 तसेच सुरक्षितता अॅप्सबाबत जनजागृती केली जाणार आहे.कौटुंबिक किंवा सामाजिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या पीडित महिलांना समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे कामही पथक करणार आहे.

गर्दीचे सण-उत्सव, मेळावे किंवा आंदोलनांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्तही वाढविण्यात येणार आहे.

धुळे, शिरपूर आणि साक्री या तीन ठिकाणी सुरू होणाऱ्या दामिनी पथकांमुळे महिलांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांना निर्भयपणे वावरता यावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण