धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक लाच घेताना रंगेहात अटकेत
या प्रकरणातील आरोपी विश्वजित संजय भामरे (वय ३१), तांत्रिक सहाय्यक, पंचायत समिती धुळे यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या मोजमाप पुस्तिकेची तपासणी पुढे पाठविण्यासाठी शाखा अभियंता व उपअभियंत्यांच्या नावाने ७ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या वहिनीच्या नावे मौजे नंदाळे बु. येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली असून त्यापैकी काही अनुदान प्राप्त झाले होते. उर्वरित अनुदान मिळविण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आरोपी विश्वजित भामरे यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांनी काम पाहिले तर तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खासगी व्यक्ती काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा