धुळे पोलिसांची मोठी कारवाई : 7.47 कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश
धुळे, दि. 16 (प्रतिनिधी) – धुळे जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि ठोस कारवाई करत विविध गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा कायदेशीर प्रक्रियेनुसार नाश केला. NDPS कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण 25 गुन्ह्यांमधील 3624.600 किलो वजनाचा व सुमारे 7 कोटी 47 लाख 16 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
या कारवाईत सुका गांजा (2109.710 किलो), गांजाची झाडे (1344.930 किलो) व अफूची बाँडे (119.960 किलो) यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन व राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.सदर कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. यासाठी मोठा खड्डा करून त्यामध्ये जप्त अंमली पदार्थ टाकण्यात आले. त्यावर शेणखत, चुरी, सिंगल सुपर फॉस्फेट व ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण टाकून कम्पोस्ट पद्धतीने नाश करण्यात आला.
या वेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली कारवाई पार पडली. समितीचे सदस्य म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, तहसीलदार महेंद्र माळी आणि सहायक रासायनिक विश्लेषक एम. ए. कुलकर्णी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पडताळणी करून मुद्देमालाची मोजणी करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पंचनामा प्रक्रिया पार पाडली. यावेळी वनरक्षक महारु रमता देसाई व रविंद्र गटरसिंग पावरा (वन परिक्षेत्रीय कार्यालय, सांगवी) पंच म्हणून उपस्थित होते.
तसेच या मोहिमेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मनोज कचरे, श्रेणी उपनिरीक्षक किशोर चव्हाण, कैलास जाधव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूर येथील सलिम मुसा पटेल (काटा कारकून) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश जाधव, सुरेश भालेराव, नितीन दिवसे, प्रशांत माळे, मयूर पाटील आणि मुद्देमाल कारकून नितीन पाटील, दगडू कोळी, बाळू चव्हाण, राहुल पाटील यांच्यासह शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी जाकीर शेख, दिनेश सोनवणे, कृष्णा पावरा, स्वप्नील बांगर यांनीही कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण प्रक्रिया पंचांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली. अंमली पदार्थांविरुद्ध धुळे पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील कठोर आणि ठाम भूमिकेचे द्योतक मानली जात आहे.

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा