कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे डॉ. कैलाश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

नंदुरबार ता. प्रतिनिधी राम सोनवणे :
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे डॉ. कैलाश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न  संरक्षित शेती काळाची गरज_ मा.डॉ. कैलाश मोते, माजी संचालक फलोत्पादन, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य 

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 समारोप प्रसंगी माजी संचालक, फलोत्पादन मा. डॉ. कैलाश मोते यांनी आपल्या मार्गदर्शनात भाजीपाला नर्सरी व्यवसायाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना आधुनिक नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. त्यांनी गुणवत्तापूर्ण रोपे निर्मितीमुळे उत्पादनवाढ व अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो, यावर भर दिला. तसेच फलोत्पादन क्षेत्रातील विविध शासकीय योजना, अनुदान योजना, संरक्षित शेती, ठिबक सिंचन, शेडनेट व पॉलीहाऊस यांसारख्या योजनांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी व मार्गदर्शक विचारांमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण झाला. 

   

कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा नंदुरबारचे प्रकल्प संचालक श्री. दीपक पटेल उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. राजेंद्र दहातोंडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शेतकऱ्यांनी आधुनिक नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण रोपे तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. वैभव गुर्वे यांनी नियोजन, अंमलबजावणी व मार्गदर्शनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्रीमती आरती देशमुख आणि श्री. राजेश भावसार यांनी केले.

तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये सहभागी युवा शेतकऱ्यांना प्रो ट्रे भाजीपाला नर्सरी उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यात आले. यामध्ये योग्य बियाण्यांची निवड, कोकोपीट व इतर माध्यमांची तयारी, ट्रे भरण्याची पद्धत, रोपांची संगोपन तंत्रे, पाणी व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कमी खर्चात अधिक दर्जेदार रोपे तयार करण्याच्या पद्धतींबाबतही माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ व्याख्यानांच्या माध्यमातून सहभागी युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये श्री. जयंन्त उत्तरवार, श्री. पद्माकर कुंदे, डॉ. भूषण बिरारी, डॉ. विनायक फसाके आणि श्री. गणेश सदगीर यांनी आपल्या विषयानुरूप सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संदीप कुवर, डॉ. खुशाल राठोड, श्री. किरण मराठे, कल्याणराव पाटील, कैलास सोनवणे, राजेसिंग साजपुत आणि अनिल वळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण सुरळीतपणे पार पडले.

प्रशिक्षणाचा समारोप सोहळाही उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त मा. श्री. स्वप्नीलभाई पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक (फलोत्पादन) डॉ. कैलाश मोते उपस्थित होते.
यावेळी श्री. राजेंद्र दहातोंडे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून उत्पन्नवाढ साधावी, असे आवाहन केले.

प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सहभागी शेतकऱ्यांना नाशिक येथील ओम गायत्री नर्सरी आणि सह्याद्री फार्म येथे प्रात्यक्षिक पाहणी दौरा घडवून आणण्यात आला. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आधुनिक नर्सरी व्यवस्थापन, स्वयंचलित सिंचन व्यवस्था व उच्च दर्जाची रोपे निर्मिती प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवामुळे प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.

एकूणच, या प्रशिक्षणामुळे युवा शेतकऱ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात लक्षणीय वाढ होऊन गुणवत्तापूर्ण रोपे निर्मिती, उत्पादनवाढ आणि शेतीतील नफ्यात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण