धुळ्यात सरकारी नोकरीच्या नावाखाली ७८ लाखांचा महाघोटाळा; १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल


धुळे प्रतिनिधी : 
धुळे: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लक्ष्य करून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपयांचा गंडा घालणारी एक मोठी टोळी धुळ्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल ७८ लाख ७४ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी धुळे शहरातील दोन पोलीस ठाण्यांत एकूण १३ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अंबिका नगरमधील एका तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संशयितांनी फिर्यादीचा भाऊ वेदांत आणि त्याच्या मित्रांना आरोग्य विभाग, आयकर विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी चक्क टपालाद्वारे बनावट नियुक्तीपत्रे पाठवली. या बदल्यात वेदांत मोराणकर यांच्याकडून ऑनलाइन ३९ लाख ७४ हजार ५०० आणि रोख २२ लाख असे एकूण ६१ लाख ७४ हजार ५०० रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (३१८, ३३६, ३४० इ.) गुन्हा नोंदवला आहे.

दुसरी घटना देवपूर भागात समोर आली आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सोनाली साळुंखे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या बहिणीचा मुलगा रोहित खैरनार याला आदिवासी विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संशयित रोशन राजाराम सौंदाणे आणि पाटील कुटुंबातील सदस्यांसह ५ जणांनी १७ लाख रुपये घेतले.
रोहितला बनावट जॉईनिंग ऑर्डर देऊन ती खरी असल्याचे भासवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या तक्रारीवरून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन : 

एकाच वेळी दोन मोठे गुन्हे दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या टोळीने आणखी किती तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. "नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. सरकारी भरती ही केवळ अधिकृत संकेतस्थळांवरून आणि पारदर्शक पद्धतीनेच केली जाते. कोणीही पैशांच्या बदल्यात नोकरीचे आश्वासन देत असेल, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण