माणुसकीचा झरा आटलेला नाही १० लाखांचे सोने सापडले अन् मूळ मालकाला सुपूर्द सोनगीरच्या 'बंडू नानां'चा प्रामाणिकपणा
सोनगीर: "आजच्या युगात माणूस पैशांसाठी माणुसकी विसरत चालला आहे," असे म्हटले जात असतानाच धुळे जिल्ह्यातील सोनगीर फाट्यावर एका घटनेने या विधानाला छेद दिला आहे. रस्त्यावर पडलेले तब्बल १० लाख रुपये किमतीचे ७ तोळे सोन्याचे दागिने एका दुकानदाराने पूर्ण प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केले. 'साई कोल्ड्रिंक्स'चे मालक प्रशांत देशमुख (उर्फ बंडू नाना) यांनी दाखवलेल्या या अजोड प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, "खरोखर देव माणसातच असतो," याची प्रचिती नागरिकांना आली आहे. बँकेचे काम न झाल्याने परतताना घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील शेतकरी राजेंद्र परबत सूर्यवंशी हे आपल्याकडील ७ तोळे सोने घेऊन नरडाणा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 'गोल्ड लोन' घेण्यासाठी गेले होते. मात्र, बँकेत तांत्रिक ऑडिट सुरू असल्याने त्यांच्या कर्जाची प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे विषण्ण मनाने ते पुन्हा आपल्या गावाकडे परतत होते.
परतीच्या प्रवासात सोनगीर गावातून भाजीपाला घेत असताना, सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलला लावलेली पिशवी अचानक तुटून खाली पडली. या पिशवीत १० लाखांचे मौल्यवान दागिने होते, याची सूर्यवंशी यांना कल्पनाही नव्हती. सापडले १० लाखांचे सोने; अनमोल ठरला प्रामाणिकपणा रस्त्यावर पडलेली ही पिशवी प्रशांत देशमुख यांना सापडली. पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याचे दागिने असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणताही मोह न ठेवता ती आपल्या दुकानात सुरक्षित ठेवली. तसेच, "ज्याची पिशवी असेल, त्यालाच ती परत करू अशी कल्पना आजुबाजूला असणाऱ्या दुकानदारांना दिली होती.
दुसरीकडे, चिमठावळ येथे पोहोचल्यावर पिशवी गायब असल्याचे सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. १० लाखांचे सोने हरवल्याच्या धक्क्याने ते अक्षरशः कोलमडून पडले. रडत-रडतच ते पुन्हा शोध घेत सोनगीर फाट्यावर आले. तेथे त्यांनी प्रशांत देशमुख यांना विचारणा केली असता, देशमुख यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती पिशवी सूर्यवंशी यांच्या स्वाधीन केली. आपले दागिने सुरक्षित असल्याचे पाहून सूर्यवंशी यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. याकामी चिंतामण धनगर आणि संदीप गुजर यांचेही सहकार्य लाभले. बंडू नाना यांच्या या कृतीमुळे समाजासमोर एक आदर्श उभा राहिला असून, संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा