शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात

शिरपूर तालुक्यात आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेला’ सुरुवात

शिरपूर प्रतिनिधी ,शेतकरी व आदिवासी प्रश्नांसाठी विविध संघटनांचा संयुक्त एल्गार शिरपूर तालुक्यातील शेतकरी, आदिवासी व कष्टकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), भारतीय सामाजिक हक्क व न्याय अधिकार संघ, भारतीय समाज सेवा संघ तसेच एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ‘भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रा’ सुरू होत आहे.

दि. 12 जानेवारी 2026 रोजी या संघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार असून, दि. १ फेब्रुवारी 2026 रोजी शिरपूर तालुक्यातील पाचकंदील, शिरपूर (जि. धुळे) येथे भव्य समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

या संघर्ष यात्रेच्या प्रमुख मागण्यांमध्ये शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, रात्रपाळीची वीज बंद करून दिवसा वीजपुरवठा करावा, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा यांचा समावेश आहे. यासोबतच सीसीआयमार्फत शेतमालाची संपूर्ण खरेदी करावी, शिरपूर सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करावा, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पर्यावरण व आदिवासी प्रश्नांवरही या यात्रेतून आवाज उठवण्यात येणार असून, अरावली पर्वत व नाशिक परिसरातील वृक्षतोड वर्गीकरण रद्द करावे, तसेच जल, जंगल व जमीनविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशीही ठाम भूमिका या संघर्ष यात्रेत मांडली जाणार आहे.

या संघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी अ‍ॅड. राहुल मखरे (प्रशिक्षण प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – महाराष्ट्र राज्य) आणि मा. जिंतेंद्र मराठे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – धुळे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या यात्रेच्या आयोजनात मा. व्यंकटराव पाटील (तालुकाध्यक्ष), मा. पंडित पवार, मा. मोहन कोळी, मा. प्रल्हाद पाटील, मा. वामन उर्फ दिलीप पाटील (विधानसभा क्षेत्र अध्यक्ष), मा. ओंकार आबा जाधव, मा. धरमसिंग पवार, मा. राजेंद्र पाटीलसर, मा. अ‍ॅड. रोहितकुमार पाटोळे आणि मा. देवसिंग सोनवणे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत आहेत.

भूमिपुत्र शेतकरी संघर्ष यात्रेमुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी व आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती होणार असून, शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टोकरतलाव ता.जि.नंदुरबार येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण