धुळे पोलिसांचा इशारा नायलॉन / चायनिज मांजाच्या विक्री-वापरावर कडक कारवाई व सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार
धुळे प्रतिनिधी
आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन, चायनिज अथवा सिंथेटिक मांजाची अवैध विक्री, वाहतूक, साठवणूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केवळ जप्तीपुरती मर्यादा न ठेवता, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा (BNS कलम 110) गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा धुळे पोलिसांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक धुळे, मा. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, नायलॉन अथवा चायनिज मांजा हा मानवी तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवितास अत्यंत घातक असल्याने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्याचे घातक परिणाम माहिती असूनही नफ्यासाठी विक्री केल्यास तो गुन्हा सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाच्या व्याख्येत येतो. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा व कठोर कारवाईची तरतूद आहे.
कोणकोणते कलम लावले जाणार
- BNS कलम 110 – सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न
- BNS कलम 223 – जिल्हादंडाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन
- पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 व 15 – ५ वर्षांपर्यंत कारावास व १ लाख रुपयांपर्यंत दंड
- विशेष मोहिम राबविणार
- धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून विशेष पथके स्थापन करण्यात आली असून,
- साध्या वेशातील पथके ग्राहक बनून दुकाने तपासणार
- गोदामे व घरांमध्ये साठवलेल्या मांजावर छापे
- पतंग विक्रेत्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येणार
- नागरिकांना आवाहन
नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन किंवा चायनिज मांजा खरेदी करून देऊ नये. हा मांजा तुटत नसल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला अडकून गंभीर अपघात होतात, तसेच विद्युत तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.
तक्रार कुठे करावी
- आपल्या परिसरात नायलॉन / चायनिज / सिंथेटिक मांजाची विक्री सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ
- Dial 112,
- जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा
- पोलीस नियंत्रण कक्ष धुळे – 02562-288211 / 288212
- या क्रमांकांवर माहिती द्यावी.
- माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा