बेटावद येथे संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
भारतीय संविधान दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील बेटावद ग्रामपंचायतीत संविधान जागरूकता कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारिणी, सहकारी सोसायटी तसेच गावातील समस्त ग्रामस्थ व युवा मित्रमंडळींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानातील मूल्ये, अधिकार, कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करत संविधानाच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला.
यानंतर आयोजित रक्तदान शिबिरास गावातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. एकूण 29 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाचे योगदान दिले. रक्तदात्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजकांचेही ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसर “जय भीम, जय संविधान, जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणांनी दुमदुमून गेला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा